पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोगत व्यक्त केले नाही. मनोगत व्यक्त करणे त्यांनी स्वत:च टाळले, की त्यांना बोलूच दिले गेले नाही? अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली आहे.
प्रदर्शनाला उपस्थित मंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनोगत करणे अपेक्षित होते, मात्र थेट राज्यपाल रमेश बैस बोलायला उभे राहिले. त्यावेळी निवेदिकेकडून राजशिष्टाचार चुकला असे सर्वांनाच वाटले. मात्र, राज्यपालांचे मनोगत संपल्यावर थेट आभार प्रदर्शन झाले. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
मंच कोणताही असला तरी दादा त्यांच्या खास शैलीत व्यक्त होतात. मग राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात नेमके काय घडले? त्यांनी स्वत:च मनोगत टाळले की त्यांना व्यक्त करू दिले नाही, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले गेले. अजित पवार खुलासा करतील तेव्हाच यामागचे गुपित जनतेसमोर येईल, अशी चर्चा यानिमित्ताने होत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनांद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.