यवत: कृषि उत्पन्न बाजार समिती, स्वनिधीतून करण्यात येत असलेल्या सुमारे ४२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ शनिवारी (दि.९) दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते पार पडला.
यामध्ये कांदा शेड बांधकाम १३ लाख ७२ हजार, तरकारी व डाळींब शेड बांधकाम – १६ लाख ९६ हजार व वॉल कंपाऊंड बांधकामासाठी १२ लाख ४ हजार रुपये अशा एकूण ४२ लाख रुपये किंमतीच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बाजार समितीने शेतकरी व व्यापारी बांधवांचे हित जोपासत पारदर्शी कामकाज करावे, बाजार समितीच्या समितीच्या आवारात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व पुणे जिल्ह्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे तसेच सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले. तर उपस्थित हमाल, मापाडी, व्यापारी व शेतकरी बंधूंशी संवाद साधला.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे, सर्व संचालक, आडते, व्यापारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.