लोणी काळभोर (पुणे) : कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील श्रीनाथ शेती भांडारमध्ये तब्बल २४ वर्ष कृषी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करणारा व्यक्ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता.२९,ऑक्टोबर) घडली. बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा त्वरित शोध घेण्यासाठी नातेवाईक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, लोणी काळभोर पोलीस तपासाच्या नावाखाली कागदी घोडे नाचवित असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विकास रामराव गोंगते (वय-४६, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी,ता. हवेली) असे बेपत्ता झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास गोंगते हे मागील २४ वर्षापासून कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील श्रीनाथ शेती भांडारमध्ये कृषी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करीत आहेत. गोंगते हे रविवारी (ता.२९ ऑक्टोबर) हडपसर येथे कामानिमित्त चाललो आहे, असे नातेवाईकांना सांगून गेले होते. मात्र, ते परत आले नाही. याबाबत नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे.
दरम्यान, गोंगते यांची दुचाकी हडपसर येथे मंगळवारी (३१,ऑक्टोबर) मिळाली आहे. त्यानंतर नातेवाईक गोंगते यांच्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारून विचारपूस करत आहेत. या प्रकरणात पोलीस तपास करताना हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गोंगते यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोलीस कर्मचारी जनतेचा सेवक असूनसुद्धा कर्तव्यावर असल्याचा बनाव करीत असेल, तर कार्यालयीन कामांत कामचुकारपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ठोस पाऊले उचलण्याची आता खरी गरज निर्माण झाली आहे. तसेच कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
उरुळी कांचन येथील एक तडीपार अट्टल गुन्हेगार लोणी काळभोर पोलिसांच्या समोरच ठाण्याच्या हद्दीत फिरत असून हौदोस घालत आहे. मात्र, पोलीस याकडे डोळेझाक करीत आहेत. तर मागील चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या कृषी केंद्र व्यवस्थापकाचा शोध घेण्यासाठी नातेवाईक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वारंवार चकरा मारत आहेत. मात्र, लोणी काळभोर पोलीस तपासाच्या नावाखाली कागदी घोडे नाचवित असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हे
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या, चोरी व हाणामारी झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला आहे की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घरफोड्या होत आहेत. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु असून, लोणी काळभोर पोलीस मात्र काहीच झाले नसल्याच्या आविर्भावात असतात.
खबऱ्यांचे नेटवर्क संपले का?
मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.