दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यात निरा नदीवरील बोराटवाडी, खोरोची, पिठेवाडीसह इतर बंधाऱ्यांमधून पाण्याची होत असलेली गळती थांबवण्याचे काम तात्काळ सुरू करावे, अशी सूचना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी (दि.१७) केली. त्यानुसार बोराटवाडी, खोरोची आदी बंधाऱ्यांस जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आजच (शनिवारी) भेट देऊन, पाण्याची गळती बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
नीरा नदीवरील बंधार्यांमधून होणारी पाण्याची गळती बंद करणेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी जलसंपदाचे पुणे पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, बारामती विभागाचे उपअभियंता अश्विन पवार, शाखा अभियंता झगडे, के. एस. सावंत यांचेशी तात्काळ कार्यवाही सुरु करण्यासाठी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार शाखा अभियंता झगडे, सावंत यांनी बोराटवाडी, खोरोची बंधाऱ्याची पाहणी करून उद्यापासून गळती थांबविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे शेतकऱ्यांशी बोलताना नमूद केले.
निरा भिमा कारखान्याचे माजी संचालक आदिनाथ पाटील, दूधगंगा संघाचे संचालक दयानंद गायकवाड, शहाजी पाटील, कांतीलाल नरुटे, संतोष फडतरे, दत्तू फडतरे यांच्यासह बोराटवाडी, खोरोची येथील शेतकऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क करून बोराटवाडी, खोरोची, पिठेवाडी येथील बंधाऱ्यांची गळती होत असल्याने, हे बंधारे पाण्याअभावी लवकर कोरडे पडून शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांची गळती बंद करणेसाठी मोहीम हाती घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जलसंपदा खाते तातडीने गळती बंद करण्यासाठी कामाला लागले आहे.