पुणे : महिलांप्रती सन्मान, आदर व्यक्त करण्याबरोबरच त्यांना खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी जिल्हा सहनिबंधकांनी दिली आहे. महिला दिनानिमित्ताने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतील २७ दुय्यम निबंधक कार्यालयातील आज, गुरुवारी (सात मार्च) एका दिवसाचा कारभार कार्यालयातील कनिष्ठ अथवा वरिष्ठ लिपिक महिलांच्या हाती सोपविण्यात आला आहे.
पुणे शहराचे मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. जागतिक महिला दिन शुक्रवारी (ता. ८) आहे. यंदा महाशिवरात्रीमुळे कार्यालयास सुट्टी आहे. त्यामुळे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आजच (ता. ७) महिलांकडे दस्त नोंदणी कार्यालयांची जबाबदारी दिली आहे.
जिल्हा निबंधक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी वर्षा तामोरे यांच्याकडे सहजिल्हा निबंधक वर्ग एक या कार्यालयाचा कार्यभार एक दिवसासाठी देण्याची विनंती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक दीपक सोनवणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, तामोरे यांच्याकडे एका दिवसासाठी कार्यभार देण्यात येणार आहे.
दरम्यान, शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांपैकी काही कार्यालयांत सध्या महिला कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी आहे. मात्र, त्या कर्मचाऱ्यांना अन्य ठिकाणच्या कार्यालयांची जबाबदारी एका दिवसासाठी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी अन्य महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. यानिमित्ताने दुय्यम निबंधक कार्यालयात वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक महिला कर्मचाऱ्यांवर एक दिवस सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत हिंगाणे यांनी आदेश जारी केला आहे.
… तर महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल!
जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान, आदर व्यक्त करताना त्यांच्या हातात सूत्रे दिली, तर त्या चांगले काम करू शकतात, हे दाखवून देण्यासाठी मी शहरातील २७ कार्यालये तसेच माझ्या पदाचा एक दिवसाचा कार्यभार महिलांच्या हाती दिला आहे. त्यातून महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा मला विश्वास वाटतो.
– संतोष हिंगाणे, मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहनिबंधक, पुणे