पुणे : खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यात पदभरती करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीची ऑनलाईन कामासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यात पवित्र संकेत स्थळामार्फत राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या कामकाजासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली असून, शिक्षक भरतीप्रक्रियेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार, याकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा, शासकीय, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. रिक्त पदांचा शैक्षणिक कामकाजावर, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
त्यामुळे राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यानुसार पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीचा पहिला टप्पा राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.
त्यामुळे भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन या कंपनीला ६८ लाख ८४ हजार १२० रुपये देण्यासही मान्यता देण्यात आली. त्यासाठीचा करारनामा शिक्षण आयुक्तांनी करण्याबाबत शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.