पुणे : नुकताच ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
आनंद दिघे यांची मुख्य भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने या चित्रपटात साकारली. प्रसादने साकारलेलया या भूमिकेचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. नुकतीच आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी झाली. यानिमित्ताने प्रसाद ओकने एक मोठी घोषणा केली आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक म्ह्णून प्रसाद ओक सर्वाना परिचित आहेच पण प्रसाद ओक आता लेखकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय आणि दिग्दर्शनासोबत प्रसाद ओक लेखन क्षेत्रात पदार्पण करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ”माझा आनंद” हे पुस्तक प्रसाद ओकने लिहिलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल असंही प्रसाद ओक म्हणाला.
प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. प्रसाद ओकने आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ”माझा आनंद” हे त्याचं नवीन पुस्तक लवकरच प्रकाशित होईल असं इन्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे.
‘मा. दिघे साहेबांना विनम्र अभिवादन…!!! लवकरच #धर्मवीर च्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटा इतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!!’ अशा शब्दांत प्रसाद पोस्ट शेअर करत व्यक्त झाला आहे.
धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस उलटले तरीही या चित्रपटाची जादू ओसरली नाही. या चित्रपटाचे संवाद सुद्धा प्रेक्षकांमध्ये सुपर हिट ठरले.