पुणे : पीएमपीमध्ये हंगामी रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला वाहकांना चांगली वागणूक द्या, त्यांना पहाटे लवकरची व रात्री उशीराची ड्युटी देऊ नका, अशा सूचना सर्व डेपो व्यवस्थपाकांना देण्यात आल्या आहेत. पीएमपी प्रशासनाकडे अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा आल्यानंतर संबधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक व्यवस्थापकांनी सर्व डेपो प्रमुखांना दिला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली होती. त्या वेळी झालेल्या बैठकीत चाकणकर यांनी ‘पीएमपी’मध्ये काम करणाऱ्या महिलांना होत असेलल्या त्रासाबाबत माहिती दिली होती.
हंगामी रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला वाहकांच्या कामाची वेळ निश्चित नाही. डेपोमध्ये त्यांना बराच वेळ प्रतिक्षा करावी लागते. टाइम किपरकडून या महिलांना योग्य वागणूक दिली जात नाही, तसेच असभ्य भाषा वापरली जाते. यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण असून, त्यांच्यात असुरक्षितेची भावना निर्माण होत आहेत, अशा तक्रारी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत चाकणकर यांनी थेट बकोरियांना यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बकोरिया यांनी वाहतूक व्यवस्थापकांना याबाबत सर्व माहिती घेऊन कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. अशा प्रकारच्या तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे आल्यास संबंधित सेवक व डेपो प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, काही तक्रारी वरिष्ठांच्या कानावर ही गेल्या होत्या, पण त्या तक्रारीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात होते. अखेर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे या तक्रारीची माहिती गेली होती. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून नवीन ‘पीएमपी’च्या अध्यक्षांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.