पुणे : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सासू – सासरे व पतीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पुणे येथील सहा. जिल्हा व सत्र न्यायधीश डी. आर. शेट्टी यांच्या कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. संदीप शेवाळे, गणेश शेवाळे, सुमनबाई शेवाळे असे निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप शेवाळे, वडील गणेश शेवाळे, सासू सुमनबाई शेवाळे व मयत पत्नी माधवी हे कोंढवा परिसरात राहत होते. 24 मार्च 2016 रोजी आरोपी संदीप शेवाळे याचा पत्नी माधवी सोबत स्वयपाकाच्या कारणावरून संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भांडण झाले होते. पती घराच्या बाहेर गेल्यावर माधवी हिने रागाच्या भरात स्वताच्या अंगावर घरी स्टोव्ह मधील रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात ती गंभीर भाजली होती.
पत्नीच्या ओरडा ओरडीचा आवाज ऐकून आरोपी संदीप व घरमालक असे पळत घरात गेल्यावर झाला प्रकार पाहून पाणी टाकून आग विझवली व माधवीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, 27 मार्च 2016 रोजी उपचारादरम्यान माधवीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माधवीच्या वडिलांच्या फिर्यादीवरूनआरोपी पती संदीप सासरे गणेश व सासू सुमनबाई व नणंद उषा झुंजारे यांचे विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या केस मध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्या व्यतिरिक्त मयत माधवी हिने मृत्य पूर्वी तिचा मृत्युपूर्व जबाब नोंदवला होता.
आरोपी तर्फे अॅड. नितीन भालेराव यांनी काम पहिले. आरोपी यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसून आरोपी सासरे गणेश शेवाळे, सासू सुमनबाई हे यवतमाळ येथील कायमचे रहिवासी असून मयत व आरोपी संदीप हे पुण्यात राहण्यास असल्याने सासू व सासरे या दोघांचा गुन्ह्याशी काही संबंध नाही. तसेच आरोपी संदीप शेवाळे याने कधीही मयत व तिच्या घरच्यांकडे पैसे मागितले नाहीत.
दम्यान, पोलिसांनी मयताचे नातेवाईकांच्या व्यतिरिक्त इतर साक्षीदार तपासले नाहीत असा आरोपी तर्फे युक्तिवाद अॅड. विपुल दुशिंग यांनी केला. आरोपि पक्ष व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील सहा. जिल्हा व सत्र न्यायधीश डी.आर.शेट्टी यांच्या कोर्टाने तिन्ही आरोपींना त्यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती अॅड. नितीन भालेराव यांनी दिली. या कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड शुभम पालवे, अॅड. अन्वी भोसले यांनी मदत केली.