पुणे : बिबवेवाडी भागात १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपट्टू शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून करणारा आरोपी शुभम उर्फ ऋषीकेश भागवत याला न्यायालयात फिर्यादीने ओळखले आहे. ‘यानेच आमच्या मैत्रिणीचा गळा चिरला’, अशी साक्ष फिर्यादीने सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात शुक्रवारी दिली. विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांनी फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली.
नेमकं प्रकरण काय?
बिबवेवाडी भागात एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी घडली हाेती. या घटनेत मृत्युमुखी पडलेली शाळकरी मुलगी राष्ट्रीय कबड्डीपटू होती. ती बिबवेवाडी भागात कबड्डीच्या सरावासाठी गेली असताना तेव्हा आरोपी शुभम भागवत दोन मित्रांसह दुचाकीवरुन तेथे आला. त्यानंतर त्याने मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला. ‘तू इथे का आला ?” अशी विचारणा तिने त्याच्याकडे केली. त्याचवेळी शुभमने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदार मित्रांनी देखील तिच्यावर वार केले.
मुलगी रक्ताच्या थारोळ्यात..
मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा आरोपी भागवतने तिच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याची धमकी दिली. मुलगी मरण पावल्याची खात्री पटल्यानंतर तो साथीदारांसोबत घटनास्थळावरुन पळून गेला. भागवतने आमच्या मैत्रिणीचा गळा चिरला, अशी साक्ष फिर्यादीने दिली. विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंझाड यांनी फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली आहे.
४२ वार करुन केला होता खून..
न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपी भागवतला येरवडा कारागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ काॅन्फरसिंग) हजर करण्यात आले होते. एकतर्फी प्रेमातून भागवत आणि त्याच्या साथीदारांनी मुलीवर तब्बल ४२ वार करुन तिचा खून केला होता. याप्रकरणी आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीचा निर्घृण खून करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विधानसभेत प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी शुभम बाजीराव भागवत (वय २२) याच्याविरुद्ध खून, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.