लोणी-काळभोर : सोलापूर येथील तुरुंगातून बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी आणलेला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला होता. या आरोपीला स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडीतून ताब्यात घेतले आहे. शिवाजी महादेव पेटाडे (वय 28, रा. उंबरे पागे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून सोलापूर तुरुंगात असलेला आरोपी शिवाजी पेटाडे याला बार्शी सेशन कोर्टात हजर करत असताना पोलिसांच्या ताब्यातून तो पळून गेला होता. याबाबतची तक्रार सोलापूर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या बार्शी पोलीस ठाण्यात २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान, फरार शिवाजी पेटाडे या आरोपीबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस शिपाई राहुल कर्डिले, प्रशांत सुतार, तोफिक सय्यद तसेच कुंजीरवाडीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष बापूसाहेब घुले, विनोद सावंत आणि सार्थक मोटे या स्थानिक नागरिकांच्या सहकार्यातून पेटाडे या गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले.
याबाबत टेंभुर्णी व बार्शी पोलीस स्टेशन चे तपासी अधिकारी यांना कळविण्यात आले असून गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरिता बार्शी पोलीस स्टेशन पथकाला लोणी काळभोर पोलिसांनी कळविले आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस शिपाई राहुल कर्डिले, प्रशांत सुतार, तोफिक सय्यद,पोलीस मित्र संतोष गायकवाड, राहुल गायकवाड,संतोष ओव्हाळ, सागर बोडरे यांनी केली.