शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्या निकिता हरगुडे यांना नगरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीने कल्याणी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना जोरदार धडक दिली होती. या अपघातात निकिता हरगुडे यांचा बुधवारी (ता. 09) पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सणसवाडी येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झालेले असताना नुकतेच निकिता हरगुडे या ग्रामपंचायत सदस्या युवतीचे अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जून 2024 मध्ये दत्तात्रय हरगुडे हे पायी रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले होते. अशातच आता अहमदनगर बाजूने पुणेच्या दिशेने चाललेल्या दुचाकीची धडक बसून निकिता रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याने तिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, चार महिन्यात दोन सदस्यांना आपल्या अशा प्रकारे अपघात होऊन मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.