Accident | पिंपरी, (पुणे) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या मदर तेरेसा उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या अपघातात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या एका विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २९) पहाटे घडली.
कृतिका कौर (वय-२३, सध्या रा. महिंद्रा एमकेआर सोसायटी, पिंपरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर, दिगज्योत धिमन (वय-२४, महिंद्रा इन्फिनिया सोसायटी, पिंपरी), दृष्टी जिग्नेश ठक्कर (वय-२४) मणी तोमल (वय-२४), अनुष्का यादव (वय-२४), लुईस बॅरेटो बेनेझोला (वय-२२, रा. सर्व पिंपरी) असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगतच्या मदर तेरेसा उड्डाण पुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कृतिका शहरातील एका महाविद्यालयात शिकत होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास कृतिका मैत्रिणींसोबत कारने जात होती. त्या वेळी दिगज्योत धिमन कार चालवत होती. मदर तेरेसा उड्डाण पुलावर ऑटो क्लस्टरकडून काळेवाडीकडे जाणार्या मार्गावरील दुभाजकाला त्यांची कार धडकली.
दरम्यान, वेग जास्त असल्याने कार उलटून अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी कृतिका कौर हिचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर चारजणी जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक दिगज्योत धिमनवर गुन्हा दाखल केला आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सोमनाथ मुठे यांनी फिर्याद दिली आहे.