केडगाव : दौंड तालुक्यातील जावजीबुवाची वाडी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला जोरदार धडक दिली. यामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१२) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
जावजीबुवाची वाडी येथे विचित्र अपघात झाला. यामध्ये महिलेला जोरदार धडक देऊन ती दुचाकी समोर चाललेल्या अजून एका कारला पाठीमागून धडकली आणि ही धडक इतकी जोरात होती की, कार पुढे असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. तर कारमधील एअरबॅगमुळे एक महिला व दोन पुरुष असे तिघे जण थोडक्यात बचावले. मात्र, या अपघातात कारच्या पुढील आणि मागील बाजूचे मोठं नुकसान झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दौंडकर घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास यवत पोलीस करत आहेत.