गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील घाटात एका कारवर कंटेनर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा पूर्ण चक्काचूर झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दौंड तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेला असून, कुरकुंभ ते दौंड हा रस्ता वाहतुकीस अरूंद ठरत आहे. परिणामी, वारंवार अपघात घडत आहेत. आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. बुधवारी घाटातून कंटेनर दौंडहून कुरकुंभकडे निघाला होता. याचवेळी कुरकुंभहून दौंडकडे एक कार निघाली होती. कंटेनर थेट कारवर पलटी झाला. यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सुदैवाने कारमधील तिघे व कंटेनर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. यातील जखमींना दौंड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर कुरकुंभ-दौंड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाच्या व स्थानिकांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी सोडविण्यास मदत झाली.