लोणीकंद : तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय-३६, पद- सहायक पोलीस निरीक्षक, वाघोली पोलीस चौकी, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, वर्ग-२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात अर्ज दाखल होता. सदरचा अर्ज चौकशीसाठी वाघोली पोलीस चौकीचे लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याकडे होता. तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी लोकसेवक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसेवक सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरूध्द दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यामध्ये तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी प्रथम ५ लाखांच्या लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती १ रुपयांची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.