चाकण (पुणे) : चाकण एमआयडीसीमधील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावातील भांगरेवस्ती येथून या गावातील एका १८ वर्षीय तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात जुन्या आरोपींचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगरेवस्ती येथून आदित्य युवराज भांगरे (वय १८) याचे अनोळखी व्यक्तींनी घराजवळून अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, अपहृत मुलगा आदित्य भांगरे याची महाळुंगे येथील शंभू भोसले या मुलासोबत मैत्री होती. शंभू भोसले व त्याच्या साथीदारांनी गावातील रितेश संजय पवार याचा काही महिन्यांपूर्वी खून केला होता. रितेश पवार याचा भाऊ राहुल संजय पवार हा शंभू भोसले व त्याच्या मित्रांना सोडणार नाही, त्यांचा बदला घेणार असे म्हणत होता. रितेशच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आदित्यचे अपहरण करण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, अपहरण झालेल्या आदित्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आहेत. या अपहरणाच्या निमित्ताने महाळुंगे इंगळे गावातील जुने आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.