राजु देवडे
लोणी धामणी, (पुणे) : थोरांदळे (ता.आंबेगाव) येथील वस्तीवर काही दिवसांपूर्वी मेंढपाळ करगळ यांच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून बाळाला पळवण्याचा प्रयत्न केला होता. आईच्या कुशीत झोपलेला सात महिन्यांचा चिमुकला देवा करगळ बिबट्याचा हल्ल्यात जखमी झाला, पण आई सोनाली करगळ हिने बिबट्याशी झुंज देत आपल्या चिमुकल्या बाळाला बिबट्याच्या तावडीतून वाचवले.
आईच्या मायेसमोर समोर सारे क्षुल्लक असतं. आपलं बाळ तिच्यासाठी सर्वस्व असतं. मग त्याच्या रक्षणासाठी ती कुणाचाही सामना करू शकते. थोरांदळे येथील एका वस्तीत करगळ यांचा वाडा वास्तव्यास होता. रात्रीच्या दोनच्या सुमारास बिबट वाड्यावर आला आणि सर्व झोपेत असताना बिबट्याने देवा करगळ या बाळाला आईच्या जवळून पळवण्याचा प्रयत्न करत होता.
बाळाची आई सोनाली करगळ हिला जाग आल्यावर तिला हा सर्व प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरडा करून बिबट्याला पिटाळून लावले व आपल्या चिमुकल्याला वाचवले. सोनाली करगळ हिच्या धाडसाबद्दल नागापूरच्या महिलांनी त्यांच्या वाड्यावर जाऊन सन्मान केला.
दरम्यान, यावेळी राजश्री देवदत्त निकम, नागपूरच्या माजी सरपंच सुजाता रिठे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा निकम, अंकिता शिंदे, विजया शिंदे उपस्थित होते.