राजेंद्रकुमार शेळके
Aalandi News : आळंदी : श्री ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी तिथी दिनानिमित्त, श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण समितीद्वारे आळंदी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. श्री ज्ञानेश्वरी कंठभूषण हभप एकनाथ महाराज कोष्टी, वेदांत साधना वारकरी गुरुकुल (रिहे) संस्थेचे संस्थापक हभप निवृत्ती महाराज बोरकरशास्त्री व सद्गुरु वेदव्यास प्रतिष्ठानचे (पुणे) संस्थापक हभप प्रेममूर्ती बाळासाहेब खरमाळे महाराज यांनी श्री ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व केले.
काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता
या वेळी हभप चंद्रकांत महाराज वांजळे, हभप शेखर महाराज जांभुळकर, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) यांची हरिकीर्तने आयोजित करण्यात आली होती. श्री ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कीर्तनामध्ये हभप ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणाले की, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर २८७ वर्षांनंतर शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वप्नदृष्टांताने समाधीचा शोध लावला. माऊलींच्या संजीवन समाधीनंतर परकीय आक्रमणाने आळंदी उद्ध्वस्त झालेली होती. (Aalandi News) ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना आळंदीला बोलावले व एकनाथ महाराज यांना श्री ज्ञानेश्वरीमधील अपपाट काढून ज्ञानेश्वरी संपादन करण्याचे कार्य सोपविले व पुढेही याचा प्रचार प्रसार करावा असे सांगितले. श्री संत एकनाथ महाराजांनी त्या काळात असणाऱ्या सर्व ज्ञानेश्वरीच्या प्रती एकत्र करून ज्ञानेश्वरीची प्रत तयार केली. ज्यादिवशी कामकाज पूर्ण केले, तो दिन भाद्रपद मास कपिलाषष्ठी हा होता.
“बहुकाळपर्वणी गोमटी| भाद्रपदमास कपिला षष्ठी|
प्रतिष्ठानी गोदातटी| लेखन कामासाठी संपूर्ण जाहली||”
या दिवसाचे औचित्य साधून श्री क्षेत्र आळंदी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव दिमाखात संपन्न झाला.
हभप भागवताचार्य संतोष महाराज पायगुडे यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. संतोष महाराज पायगुडे म्हणाले की, श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण समितीच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरून ३० हजारहून जास्त लोकांनी लिहून पूर्ण केली तसेच समितीच्या वतीने यावर्षी श्री संत श्री एकनाथ महाराज यांच्या ४५० व्या समाधी सोहळ्यानिमित्त श्री एकनाथी भागवत लेखी हस्तलिखित दोन हजार साधकांच्या लेखणीतून साध्य होत आहे. (Aalandi News) पुढेही जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा लेखनाचे कार्य हाती घेण्यात येणार आहे. हभप विजू अण्णा जगताप, हभप धारूमामा बालवडकर, हभप निवृत्ती आबा कोळेकर तसेच ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी व सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी यांचे विशेष सहकार्य लाभले.