उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका रंजना हनुमंत खेडेकर (वय ५३, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांचे निधन झाले. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रंजना खेडेकर यांचे मूळगाव गुरुळी (ता. पुरंदर) आहे. खेडेकर दौंड व हवेली तालुक्यात त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले आहे. पांढरस्थळ येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षिका म्हणून गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होत्या. खेडेकर या गेल्या दीड वर्षापासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.
दरम्यान, रंजना खेडेकर यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अपयशी ठरली. त्यांच्या पार्थिवावर उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यांच्या पश्चात, पती, मुलगा, मुलगी, सून व जावई असा परिवार आहे.
उरुळी कांचनसह परिसरात शोककळा
रंजना खेडेकर या मागील ३३ वर्षांपासून विद्यादानाचे कार्य करत होत्या. विद्यार्थी व शिक्षक प्रिय अशी त्यांची ओळख होती. अत्यंत हुशार, प्रेमळ, मनमिळावू व कार्यतत्पर असलेल्या आदर्श शिक्षिका हरपल्याने उरुळी कांचनसह परिसरात शोककळा पसरली आहे. हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.