पुणे : पुण्यात पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एका टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.12) दुपारी साडेबाराच्या सुमारास कोंढवा खुर्द येथील अशोका म्यूज सोसायटीच्या पार्किंग मध्ये घडली आहे. समीर युसुफ मेमन (वय-35 रा. अशोका म्यूज सोसायटी, ई बिल्डींग) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे.
याबाबत समीरचा भाऊ सलीम युसुफ मेमन (वय-43) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून शाहरुख आयुब खान (वय-23 रा. फातिमा बंगलो, कात्रज), हुसेन रफिक पितळे (वय-26 रा. अंजनी नगर, कात्रज) यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करुन शाहरुख आणि हुसेन या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी सलीम यांचा लहान भाऊ जखमी समीर याचे आणि आरोपी शाहरुख याच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय शाहरुखला होता. याचाच राग मनात धरून शहरुख समीरवर चिडून होता. रविवारी दुपारी समीर सोसायटीच्या दुचाकी पार्कींगमध्ये आला असता दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.