पुणे : कोंढवा पोलीस ठाणे परिसरात पारशी मैदान येथे शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद (वय ५५) वर्षे, रा. ताहिर हाईट्स, भाग्योदयनगर यांचा अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने वार करून खून केला होता. ही घटना ४ डिसेंबरला घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्ह्यातील तीन आरोपींना कोंढवा पोलीस व गुन्हे शाखेने अटक केली आहे.
दरम्यान, आरोपीचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोनवणे यांनी दिल्या होत्या. याप्रकरणी जावेद खान (वय-26 रा. किंग स्टन इलेसिया सोसायटी, पिसोळी) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार सद्दाम शेख व साहिल शेख यांना गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. गुन्हा घडल्यानंतर दहा तासात आरोपींना अटक करण्यात आली आहे.(kondhava police Station)
कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार विकास मरगळे व जयदेव भोसले यांना माहिती मिळाली की, पिसोळी भागातील एका बंद बिल्डिंगमध्ये एक व्यक्ती काल रात्रीपासून घाबरलेल्या अवस्थेत थांबला आहे. त्याने गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. तपास पथकाने पिसोळी भागातील धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या बिल्डिंच्या टेरेसवर लपून बसलेल्या जावेद खान याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने साथीदारासह आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरुन कट रचून शहानवाज याला पारशी मैदानावर बोलावून घेत दारु पाजून त्याची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले करत आहेत. गुन्ह्यातील फरार आरोपी सद्दाम व साहिल यांना युनिट पाच चे पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.(Pune Crime News)