उरुळी कांचन (पुणे) : ‘तू येथे का आलास’ या कारणावरून एका व्यक्तीने २७ वर्षीय तरुणाला लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पीएमटी बस स्टॉपजवळ मंगळवारी (ता. १९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय ठवरे (रा. पुरंदर सोसायटी, उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, उरुळी कांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सुहास संजय गिरंजे (वय २७, रा. आश्रमरोड, शिवशंभो सोसायटी, बंगलो नं. २, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुहास गिरंजे हे उरुळी कांचन येथील गावच्या हद्दीतील पीएमटी बस स्टॉपजवळून निघाले होते. या वेळी त्यांचा मुलगा अजय ठवरे व त्याच्यासोबत असलेला सुहास यांचा मित्र सुमित लिंबोने याने हाक मारली. सुहास हे त्याठिकाणी गेले असता अजय ठवरे याने ‘तू येथे का आलास’ या कारणावरुन शिवीगाळ, दमदाटी करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या वेळी त्याने हातातील लोखंडी कड्याने डाव्या कानाच्या वरती डोक्यात मारहाण केली. या प्रकरणी सुहास गिरंजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय ठवरे याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.