दौंड (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरिम (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत हातातील धारदार तलवार हवेत भिरकावून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता. ४) ही घटना घडली आहे.
गुरुदास निवृत्ती राऊत (रा. राघोबा नगर, गिरीम, दौंड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर विविध कलमांद्वारे दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गिरिम गावात गुरुदास राऊत हा धारदार तलवार बाळगून परिसरामध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन आरोपी तरुणाला तलवारीसह ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेश भोसले करत आहेत.
दरम्यान, दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात व शहरात उघडपणे धारदार तलवार बाळगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळून येताच तत्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन दौंड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.