वेल्हे, (पुणे) : पुण्यातील मजूर तरुणाचा पानशेत धरण येथील नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नदीपात्रात बहिण भावांसह गोधड्या धुण्यासाठी गेलेल्यावर हि दुर्घटना घडली आहे. ही घटना आज रविवार (ता.२८) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल लहू चव्हाण (वय-३० वर्ष रा. भीमदीप झोपडपट्टी, बिबवेवाडी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत वडील लहू भिकू चव्हाण( वय-६४) यांनी पानशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव (ता. राजगड) व खानापूर (ता.हवेली ) या ठिकाणी चव्हाण कुटुंबीय मजुरीचे काम करण्यासाठी आले होते. दरम्यान आज सकाळी मृत अनिल चव्हाण हा त्याच्या भाव व सावत्र बहिणीबरोबर पानशेत येथील नदीपात्रात गोधडी धुण्यासाठी गेला होता. यावेळी अनिलचा पाय घसरून नदीपात्रात पडून बुडाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार पी.एन. मोघे, युवराज सोमवंशी यांनी रेस्क्यू टीमशी संपर्क केला.
दरम्यान, पाण्यामध्ये शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन माय सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, धनंजय सपकाळ, गुलाब भोंडेकर, संदीप सोलस्कर, संजय चोरगे, विजय जावळकर, गणेश जाधव यांच्या टीमने दोरखंडाचे साहाय्याने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास वेल्हे पोलीस करत आहेत.