लोणी काळभोर, (पुणे) : श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त मातीवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामांकित पहिलवानांचा मातीवरील निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा बुधवारी (ता. २४) दुपारी ३ ते रात्री ९ `वाजेपर्यंत लोणी काळभोर येथे रंगणार आहे.
कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी नामांकित पै पृथ्वीराज मोहोळ व मोहितकुमार चौधरी यांच्यात लढत होणार असून २ लाख रुपयांची इनामी कुस्ती होणार आहे. तर, दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. माऊली जमदाडे व सोनू कुमार यांच्यात १ लाख ५० हजार रुपयांची कुस्ती होणार आहे. हसन पटेल व पैलवान छोटा गणी यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
तर चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै रोहित जवळकर व समरजीत पाटील यांच्यात १ लाख ४० हजार रुपयांची निकाली कुस्ती होणार आहे. सर्व आख्यात ५१ निकाली कुस्त्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. या कुस्त्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले असून सुमारे ५१ देशात प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता. २३) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापुजा संपन्न झाली. पालखी सोहळा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता पार पडला. बुधवारी (ता. २४) पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. रात्री १२ ते ३ छबिना, पहाटे ३ ते ६ व सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.