पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्या पतीने सोडून दिल्यावर ती दोन मुलीसह एका व्यक्ती बरोबर रहात होती. पण तिला सातत्याने त्रास दिल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना आंबेगाव पठार परिसरात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी तिच्या १८ वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़. त्यावरुन पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पहिल्या पतीने सोडले आहे. त्यांना त्या पतीच्या दोन मुली आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून त्या, दोन मुलीसह आरोपीसोबत रहात होत्या. आरोपी फिर्यादीच्या आईला मानसिक व शारीरीक त्रास देत असे. तसेच तिला सतत मारहाण करुन शिवीगाळ करत असे. आरोपीने एक व्हिडिओ काढलेला त्यामध्ये आरोपी हा फिर्यादीच्या आईला आत्महत्या करण्यास चिथावणी देत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, त्याच्या याच छळाला कंटाळून महिलेने गुरुवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.