सागर जगदाळे
Bhigavan News : भिगवण : राज्याचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचा पालखी सोहळा सुरू असल्याने राज्यातील वातावरण विठूमय झालं आहे. उद्या गुरुवारी(दि.29)रोजी आषाढी एकादशी आहे. मात्र यंदा आषाढी एकादशीदिवशीच बकरी ईद साजरी केली जाणार आहे. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे उदाहरण पाहायला मिळालं आहे. बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय इंदापूर तालुक्यातील भिगवण व भिगवण परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकमताने घेतला आहे. मुस्लीम बांधवांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. (Bhigavan News)
पायी दिंडी सोहळ्यास शिरखुरम्याचे वाटप :-
भिगवनमध्ये आलेल्या पायी दिंडी सोहळ्यास भिगवण व भिगवण परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी एकतेचा संदेश देत सर्व वारकऱ्यांना शिरखुम्याचे वाटप केले होते व दिंडी थांबलेल्या ठिकाणी अगदी स्वच्छता करण्याचे कामही भिगवण मुस्लिम समाजातर्फे करण्यात आलेले होते. यामुळे भिगवण व भिगवण परिसरातील हिंदू व मुस्लिम यांच्यात एकोपा असलेला पाहायला मिळत आहे. (Bhigavan News)
एकादशीच्या दुसऱ्या दिवशी देणार कुर्बानी :-
भिगवण गावच्या मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देता, ईदच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय भिगवन पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये घेतला. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने कुर्बानी टाळण्यासाठी गावातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित बैठक घेतली. ज्यात हा एकमताने निर्णय घेण्यात आला. (Bhigavan News)
निर्णयाचे स्वागत :-
येत्या 29 जून रोजी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी कुर्बानी देऊन हा सण साजरा करतात. मात्र, हिंदू धर्मीयांची पवित्र आषाढी एकादशी याच दिवशी असल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा स्तुत्य निर्णय भिगवण परिसरातील मुस्लिम बांधवांनी सर्वांनी एकमते घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे. (Bhigavan News)
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, :-
या स्तुत्य निर्णयाचे स्वागत करताना भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाने त्यादिवशी कुरबानी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी देखील अनेक वेळा सामंजस्य भूमिका मुस्लिम समाज तसेच सर्व समाज घेत असतो.जातीय सलोखा, एकोपा टिकून ठेवण्याचे काम दोन्ही समाजाच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे.अगदी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शीरखुर्मा असेल, दिंडी थांबलेल्या ठिकाणची स्वच्छता असेल अशी कामे मुस्लिम समाजाने करून एक आदर्श जपलेला आहे. (Bhigavan News)