उरुळी कांचन : पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात भरधाव डंपरने दुभाजकावरून वळण घेण्यासाठी थांबलेल्या दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. 08) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
शेषराव गोपाळ जाधव (वय 36, हॉटेल कामगार, सध्या रा. चौधरी माथा, कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा. सलगरा (बु) ता. जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर अपघात झाल्यानंतर सदरचा डंपर चालक पळून गेला असून त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन माने यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव जाधव हे उरुळी कांचन परिसरात एका हॉटेलवरती काम करून उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जुने सोनाई हॉटेलच्या समोर शेषराव जाधव हे महामार्गावरील रस्ता दुभाजकावरून रस्ता ओलांडण्यासाठी दुचाकीसह थांबले होते. यावेळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून सोलापूरच्या बाजूने एम. एच.12 एस. एक्स. 3231 हा भरधाव डंपरने दुचाकीवरील शेषराव जाधव यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात शेषराव जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. यावेळी उरुळी कांचन येथील अक्षय बंटी कांचन, मयूर कुंजीर, संदीप कांचन, नितीन कांचन, सुरज कांचन, आकाश कांचन, यांनी तात्काळ सिद्धू चव्हाण यांच्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला.
दरम्यान, अपघातग्रस्त शेषराव जाधव यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर डंपरचालक फरार झाला असून त्याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.