पुणे : भारतीय डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन ‘पुणे पेक्स-२०२३’ बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ६ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत व ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणेकरांसाठी खुले राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या ‘मॉडर्न हायस्कूल ते बालगंधर्व रंगमंदिर फिलाटेली वॉक’ने करण्यात आली.
या वॉकमध्ये मॉडर्न हायस्कूलच्या मुख्याध्यापिका फुलारी तसेच मॉडर्न गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नाईक, आर. के. जायभाये, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, बी.पी. एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण डाक विभाग आणि अविनाश पाखरे, वरिष्ठ पोस्टमास्तर, पुणे शहर मुख्य डाकघर हे सहभागी झाले होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये यांनी भूषविले. या प्रसंगी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, गोखले इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस आर. पी. गुप्ता, डाक सेवा पुणे क्षेत्राचे निर्देशक सुश्री सिमरन कौर, पुण्याचे झोन-१ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे, इंटरनॅशनल कलेक्टर्स सोयायटी ऑफ रेअर आयटम्सचे अध्यक्ष किशोर चांडक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना पुणे शहर पश्चिम विभागाचे वरिष्ठ डाकघर अधीक्षक रिप्पन डूल्लेट म्हणाले की, हे प्रदर्शन कोविड नंतर प्रथमच आयोजित होत असून, त्यामुळे सर्व तिकीट संग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय, पुणे या दोन संस्थांवर विशेष आवरणांचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. तसेच पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या दहा वास्तुंवर पिक्चर पोस्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. आशिष लेले म्हणाले की, फिलाटेलीचा छंद व सोशल मिडिया पोस्ट याची तुलना करताना फिलाटेली हे झाडाचे खोड तर सोशल मिडिया पोस्ट ही पानगळ होणारी पाने असल्याचे सांगितले. आभार प्रदर्शन पुणे शहर पश्चिम विभागाचे (मुख्यालय) सहायक डाकघर अधीक्षक सुदाम साबळे यांनी केले.
भारताचा स्वातंत्र्यलढा अन् गणपतीचे दर्शन
या प्रदर्शनामध्ये संग्राहकांनी संग्रह केलेल्या विविध विषयावरील ७५ फ्रेम्स प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भारताचा स्वातंत्र्यलढा, गणपतीचे दर्शन घडविणारे भारतीय संस्थांनावरील वित्तीय तिकिटे, फिलाटेलीच्या माध्यमातून मानवी संवेदना, अंतराळाचे अनावरण: उपग्रह आणि अंतराळ अन्वेषणाचे जग, ओळख पुणे शहराची व भारतीय मुंडासे इत्यादी आकर्षक फ्रेम्स प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या दिवशी प्रदर्शनास पुणेकरांनी व विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. या कार्यक्रमासाठी एक वॉकथ्रू रेकॉर्ड केला आहे आणि त्याची लिंक पुणे पोस्टल क्षेत्राच्या फेसबुक आणि एक्स खात्यावर उपलब्ध करुन देण्यात येईल.