बारामती, (पुणे) : फलटण येथून लग्नकार्यावरून परतत असताना पोहण्यासाठी कालव्यात उतरलेल्या हडपसर येथील एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता. 20) सायंकाळी घडली. तुषार पोपट खेडकर (वय 21, रा. भेकराईनगर, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार खेडकर, गौरव भोसले, मंगेश शेळके आणि सूरज चौगुले हे चौघे मित्र रविवारी फलटण येथे एका लग्नकार्याला उपस्थित पाहिल्यानंतर दोन दुचाकींवरून पुण्याकडे परतत होते. परतीच्या प्रवासात निंबूत गावाजवळील निंबूत-छत्री परिसरात ते थांबले आणि नीरा डावा कालव्यात पोहण्यासाठी उतरले.
कालव्यात उतरतांना तुषार याचा पाय घसरला आणि कालव्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. त्यानंतर इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक नागरिक धावत आले त्यानंतर तुषारला पाण्याबाहेर काढण्यात आले व वाघलवाडीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
दरम्यान, भेकराईनगर येथील निखिल रमेश कुऱ्हाडे याने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.