युनूस तांबोळी / लोणी काळभोर : कोणत्याही क्षेत्रात अपयशानंतर यश हे नक्की मिळते. त्यासाठी कष्ट व चिकाटी महत्वाची आहे. आईने दिलेली शिकवण त्या बरोबर समाजकार्याची असणारी आवड यातून परिस्थीतीला सामोरे जाण्याचे धाडस केले. संसाराचा गाडा हाकत असताना वेगवेगळ्या समस्या, संकटाचा अनुभव येत गेला. त्यातून उभारी घेत शेती, व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय काम करता आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून यशस्विता मिळविता आली. अशा लोणी काळभोर च्या मंदाकिनी नितीन काळभोर या आजच्या युगाच्या नवदुर्गा ठरल्या आहेत.
घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लहानपनापासूनच खडतर प्रवास सुरु झाला. त्यातच वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्याने संसाराची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळली होती. मात्र, आईने सर्व जबाबदारी स्वीकारली. आणि मिरची कांडप केंद्र चालवू संसाराचा गाडा हाकला. मंदाकिनी हिने ही परिस्थिती अगदी जवळून पहिली होती. त्यामुळे आईने हाताळलेल्या परिस्थितीचा आदर्श घेऊन शेती, शिक्षण, बचत गट व व्यवसायात आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटविला.
मंदाकिनी यांचा जन्म कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील अल्पभूधारक शेतकरी पांडुरंग दानवले व कलावती दानवले यांच्या कुटुंबात झाला आहे. दानवले दाम्पत्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. त्यातील एक मुलगी म्हणजे मंदाकिनी. पांडुरंग दानवले हे लोणी काळभोर येथील फिलिप्स कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. मंदाकिनी आठ वर्षाची असतानाच वडील पांडुरंग दानवले यांचे निधन झाले. आणि घराची जबाबदारी आईंच्या खांद्यावर आली. आईने कुटुंबाची जबाबदारी पार पडून सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यानंतर आईने मुलामुलींची लग्न करून दिली.
मंदाकिनी यांचा विवाह लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर यांच्याशी झाला. काळभोर दाम्पत्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. विवाहाच्या काही दिवसानंतरच मंदाकिनी यांनी मुलांची जबाबदारी सांभाळत संसार फुलवायला सुरुवात केली. मंदाकिनी यांनी समाजाची जाणीव ठेवून महिलांसाठी महालक्ष्मी बचत गटाची स्थापना केली. वेगवेगळे ट्रेनिंग देऊन आर्थिक विषयाचे प्लॅनिंग केले आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला.
कदमवाकवस्ती आणि लोणी काळभोर सारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावाची गरज ओळखून वॉटर सप्लायर्स सारखा व्यवसाय सेवाभावी वृत्तीने सुरु केला आहे. आणि अजून त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. कमी जमिनीवर तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये नवनवीन वान घेऊन अनेक कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. शेतीमध्ये जैविक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्याचबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून देशी गाईंचे संगोपन, अश्वपालन शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, देशी कुक्कुटपालन अशा अनेक गोष्टींची सांगड घातली आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. शहराला जोडणारी गाव ही शिक्षणाची गरज भासू लागली. मंदाकिनी यांनी पती नितीन काळभोर यांच्या मदतीने शिक्षण क्षेत्रामध्ये सहभाग घेतला. रेनबो इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. या संस्थेच्या सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. लोणी काळभोर गावात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शिक्षणाची संधी निर्माण करून दिली आहे.
आजचे विद्यार्थी पुढे जाऊन देशाचे भवितव्य असणार आहे. विद्यार्थी समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करून समाजाची सेवा करणार आहे. शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबवून मुलांना एक चांगला नागरिक घडवण्याचे काम करण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकिय विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकतील हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मंदाकिनी काळभोर (सचिव – रेनबो इंटरनॅशनल स्कूल, लोणी काळभोर)