पुणे : पुण्यामधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. चाकणजवळील कडाचीवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने लहान मुलाला घेरुन त्याच्यावर हल्ला केला. या घटनेचा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांनी चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात चिमुकला खाली पडला असता त्याचे लचके तोडण्यात आले आहेत. यावेळी नातेवाईकांनी प्रसंगावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव बचावला आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
नाही, नाही, नाही’ म्हणत राहिला..
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला मुलगा रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. मात्र, कुत्रे समोर दिसताच हा चिमुकला थांबला. सुरवातीला एक कुत्रा लांबून त्याच्या अंगावर भुंकला तेव्हा या चिमुकल्याने घाबरुन, ‘नाही, नाही, नाही’ म्हणत कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, चिमुकल्याकडून फारसा प्रतिकार झाला नाही, तोवर कुत्रा पुढे सरसावला आणि चिमुकल्याच्या अंगावर झेप घेतली. त्यापाठोपाठ इतर कुत्र्यांनीची या लहान मुलाला घेरल्याचे पाहायला मिळत आहे.
पहिल्या कुत्र्याने झेप मारल्यानंतर हा चिमुकला जमिनीवर पडला. आजुबाजूला अनेक कुत्रे आल्यानंतर या चिमुकल्याने पुन्हा उठून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचवेळी कुत्र्यांच्या झुंडीने या चिमुकल्याला पुन्हा जमिनीवर पाडत त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केले. हा सगळा आवाज ऐकून जवळच असलेल्या घरातून एक महिला बाहेर आली. तिनेही या कुत्र्यांना हाकलवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतरही काही माणसांनी त्याठिकाणी येऊन त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. यामुळे मुलाचे प्राण वाचले. या घटनेनंतर सामान्य नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, हे पाहावे लागेल.