सागर घरत
करमाळा : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेली कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत. घरतवाडी याठिकाणी जिल्हा परिषदेअंतर्गत ९० मीटर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी ४ लाख ९९ हजार ३३ रुपये एवढा निधी आला असून, या रस्त्याच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. निविदेप्रमाणे ठेकेदार काम करत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कामासंदर्भात सखोल चौकशी केली असता, उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
घरतवाडी ग्रामस्थांनी ठेकेदाराला निविदेप्रमाणे काम करण्याचे सांगितले असतानाही ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरूच आहे. काम आटोपण्याची घाई ठेकेदार करत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करण्याचे पत्र पत्रकार सागर घरत यांनी उपअभियंत्यांना दिलेले आहे. तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची ताबडतोब सखोल चौकशी करून, संबंधित ठेकेदाराला बिल देऊ नये. काम पुन्हा खोदाई करून निविदेप्रमाणे सुरू करण्यात यावे, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा उपअभियंता यांना दिला आहे.
दरम्यान, या मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल घरतवाडी ग्रामस्थांना पडला आहे. निकृष्ट दर्जाच्या व मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.