पुणे : पुण्यातील रास्ता पेठेत टोळक्याच्या मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाला चौघे मारहाण करत असताना मध्यस्थी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला देखील मारहाण करण्यात आली. या घटनेत जखमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार बुधवारी २० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या गेटसमोर घडला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. धनंजय तिवारी (५७) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
याबाबत अशोक नर्वदा सिंग (३५, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रसाद नाथा सूर्यवंशी (१८, रा. कसबा पेठ, पुणे), अब्बास सलीम शेख (१९, रा. कसबा पेठ, पुणे), सोमेश प्रताप शिंदे (२९, रा. शिंदे वाडा, कसबा पेठ) आणि शोएब सईद शेख (३४ रा. साईबाबा नगर, कोंढवा) यांच्यावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटल समोरील गेटवर भारत सिक्युरिटी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड अनुप सिंग हा ड्युटी करत होता. त्यावेळी दुचाकीवरून सोमेश आणि यश तेथे आले. त्यांनी त्यांची दुचाकी गेटसमोर उभी केल्याने अनुप सिंग यांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी अनुप सिंग याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यानंतर सोमेश याने अब्बास, आर्यन, निल्या, प्रसाद व प्रेम साठे यांना तीन दुचाकीवरून घेऊन आला. यानंतर आरोपींनी अनुप सिंग याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी फिर्यादी अशोक सिंग आणि त्यांचे मालक मयत धनंजय तिवारी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपींनी रस्त्यावरील पीओट ब्लॉक फेकून मारले. यात अनुप सिंग याच्या अंगावर ओरखडे व मुका मार लागला. धनंजय तिवारी यांना मारहाणीमुळे त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने करत आहेत.