लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात एंजल हायस्कूलच्या 40 विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील शाळेत घेऊन निघालेल्या स्कूल बस चालकाला फीट आल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात विद्यार्थ्याना कोणतीही जखम झाली नसली तरी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस हि लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूलच्या दिशेने निघाली होती. यावेळी थेऊर फाट्याच्या चौकात रस्ता क्रॉस करताना ड्रायव्हरला फिट आली. भरधाव वेगान ही बस निघाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस ही रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमध्ये गेल्याने अपघात झाला.
सदर अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बसमधील 40 विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनाने स्कूलमध्ये पाठवण्यात आले. तसेच काही मुलांना त्यांचे पालक घरी घेऊन गेलेले आहेत. बस चालकावर कुंजीरवाडी येथील समर्थ हॉस्पिटल येथे उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलीस शिपाई कदम, सुतार, कर्डिले हजर होतो. तसेच लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार ढाकणे व पोलिस हवालदार सुलाखे यांनी वाहतूक कोंडी दूर केली. सदर बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून घेण्यात आली आहे.