मंचर : पुणे-नाशिक स्त्यावर मंचरजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचालकांचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यावर उलटला. या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली, तर तीन लहान मुलांसह ११ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १०) सकाळी सहा वाजता मंचरजवळील निघोटवाडी बायपास येथे घडली आहे. सुमन महादू जाधव (वय-८०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
भामाबाई वाळू कडाळे (वय ४०), मंदा संदीप गांगट (वय २२), कार्तिक सुरेश मधे (वय ३.५ वर्ष), आराध्या सुरेश मधे (वय ४ वर्ष), विठ्ठल सोमा दुधवडे (वय ५०), मनीषा शिवाजी भुतांबरे (वय ४०), सरू पांडू जाधव (वय ४४), शांताराम आनंद दुधवडे (वय ४०), यमुनाबाई शांताराम दुधवडे (वय ३५), हिरावाई येसू काळे (वय ४५), कृष्णा संदीप जाधव (वय ३ वर्ष) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मंचर पोलिसांनी पिकअपचालक बबन नामदेव मधे (वय-४५) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपचालक बबन मधे हा नारायणगावजवळील वळणवाडी येथून चाकण-सावर्ली येथे भात कापणीसाठी पिकअपमधून (एमएच १४ एझेड ०९५१) मजुरांना घेऊन जात होता. निघोटवाडी बायपासजवळ समोरून आलेल्या पिकअपला हुलकावणी दिल्याने चालक बबन मधे यांचे नियंत्रण सुटून मंचरजवळील निघोटवाडी बायपास येथे मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी झाला.
या अपघातात एका मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर तीन लहान मुलांसह ११ जण जखमी झाले आहेत. पिकअपचालक बवन नामदेव मधे याला मंचर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस कर्मचारी विलास हगवणे यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला आहे. जखमींमध्ये सर्व जण ठाकर समाजातील गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.