उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात वाहतूक नियंत्रक दिवे अर्थात ट्रॅफिक सिग्नल दोन वर्षांपूर्वी बसवण्यात आले आहेत. हे सिग्नल सुस्थितीत असतानाही दिवे बसवल्यावर आजतागायत अजूनही सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे ट्रॅफिक सिग्नल फक्त शोसाठी बसवण्यात आले आहेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
तळवाडी चौकातून शिंदवणे घाट, जेजुरी, सासवडकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने रस्त्यावर २४ तास गर्दी असते. महामार्गाच्या बाजूलाच शाळा, कॉलेज असल्याने विद्यार्थ्यांची देखील मोठी वर्दळ असते. मात्र, बेशिस्त रिक्षाचालक रस्त्याच्या कडेला थांबून प्रवासी भरण्यात मग्न असतात. त्यातच महामार्गावर रस्त्यातच रिक्षा व चारचाकी वाहने थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील चौकाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण व वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. शहरातील मुख्य चौकात जड वाहने उभी राहून रस्ता अडवतात तर कधी दुचाकी रस्त्यावर येतात.
सेवा रस्त्यावरून वाहने ये-जा करतात. येथे वाहतूक नियंत्रक दिवेही सुरु नाहीत आणि वाहतूक पोलिसांचाही अभाव आहे. त्यामुळे या चौकातून वाहने बेदरकारपणे ये-जा करत असल्याने या चौकात नेहमीच वाहनांची कोंडी झालेली असते. त्यामुळे या ठिकाणी असलेले वाहतूक नियंत्रण दिवे सुरु करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
वाहतूक सुरळीत होण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध सुरु
याबाबत बोलताना उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले, “पुणे-सोलापुर महामार्गावरील तळवाडी चौकातील सिग्नल काढून जुन्या इलाईट चौकात व इरिगेशन कॉलनी या ठिकाणी सिग्नल बसवण्याची आवश्यकता असून, त्याचा पाठपुरावा सुरु आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध घेण्यात येत आहे. तशा प्रकारचे फलक लावण्यात येणार आहेत.”
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई नाहीच
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर लागलेल्या कोणत्याही वाहनांवर कारवाई करत नाहीत. एक शाळा असल्याने नागरिकांना मुलांना शाळेत सोडवताना व शाळा सुटल्यावर घरी घेऊन येताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच या ठिकाणी असलेले सिग्नल हे असून होळंबा व नसून खोळंबा असल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे सिग्नल सुरु करावे.
– अक्षय (बंटी) कांचन, उपाध्यक्ष, भाजप हवेली तालुका युवा मोर्चा