पुणे : पुणे जिल्हा आणि शहरात सणासुदीच्या काळात अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने २४ लाख रुपये किमतीचा अन्न पदार्थाचा साठा जप्त केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १४ लाख ८८ हजार ३९८ रुपये आणि पुणे विभागात ९ लाख १९ हजार ५२० रुपये किंमतीच्या साठ्याचा समावेश आहे. एफडीएच्या धडक कारवाईमुळे मोठा साठा जप्त करण्यात यश आले.
सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेता जनतेस स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयामार्फत मोहीम राबविण्यात आली, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ नियमन २०११ अन्वये सदरची कारवाई केली, पुणे जिल्ह्यात अन्न आस्थापनेच्या ४८ तपासण्या केल्या असून ५५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले.
पुणे विभागात अन्न आस्थापनेच्या ८३ तपासण्या केल्या असून एकूण १०२ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. काही संशय असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (अन्न) (पुणे विभाग) सुरेश अन्नपुरे यांनी केले.