ज्ञानेश्वर मिडगुले
सणसवाडी (पुणे) : दुचाकीवर गुरांसाठी शेतात चारा आणायला निघालेल्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मांदळवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १६) घडली आहे. या बिबट्याच्या हल्यात शेतमजुर जबर जखमी झाल्याने मांदळवाडी सविंदणे डोंगर भागात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
लोमेश गुलाबराव चौधरी (वय-३२, रा. मांदळवाडी, ता. आंबेगाव) असे बिबट्याने हल्ला केलेल्या तरुण शेतमजुराचे नाव आहे. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मांदळवाडी, सविंदणे, घोलपवाडी, कोळेकर व लंघेवस्ती वरील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर व आंबेगाव तालुक्याच्या सिमेवर डोंगरभागात वसलेल्या मांदळवाडी येथे मागील काही दिवसापासून दिवसाआड कुठे ना कुठे बिबट्या दिसत आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विठ्ठल गेणूजी ढगे यांचे शेतात काम करणारा लोमेश चौधरी हा ढगेस्थळ येथील शेतात गायीसाठी गवत आणणेसाठी दुचाकी घेऊन निघाला होता. जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून लोमेशला पाडले व तोंड कपाळ डोळ्यांखाली व नाकाला ओरबाडले. लोमेशने हाताने बिबट्याचा सामना करून झिडकारले असता बिबट्या उसात पळून गेला.
दरम्यान, लोमेशला लोणीतील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मंचरचे ग्रामीण उपजिल्हा रुग्नालयात उपकार सुरु आहेत. या भागात ४ -५ बिबट्यांचा वावर असून दोन दिवसापूर्वीच घोलपवाडी शिवारात फटांगडे दरीत पिकप समोर लाईटला व हॉर्नचे आवाजाला भिवुन पळाल्याची माहिती मिळाली होती. तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मांदळवाडीचे सरपंच आदक व सविंदणेचे उपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी वनविभागाकडे केली आहे.