लोणी काळभोर: माऊली… माऊली… ‘ज्ञानोबा.. तुकाराम’ चा जयघोष, पालखीच्या पुढे मागे दिंड्या, तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सोबतीला आसमंतांत घुमणारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, अशा या भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांसह पुण्याहून निघालेला जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विसावला.

यावेळी पंचक्रोशीत जणूू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपुुुर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थां समवेत विविध सामाजिक संस्था, संघटना यांनी अपुर्व उत्साहात फुलांची उधळण करत केेले. यावेळी लोणी काळभोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झालेे होते.
पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात आज सकाळी पूजा झाल्यानंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेवून सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर कडे मार्गक्रमण केले. शेवाळेवाडी ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताचा स्विकार करून सोहळा मांजरी फार्म येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामात मिळालेल्या विश्रांतीमुळे ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी झपझप पावले टाकत होते. डोळे पंढरीकडे, मुखी विठूरायाच्या अखंड नामस्मरणाचा गजर करत, भक्तीरसात चिंब होऊन महामार्गावरील एक – एक टप्पा मागे टाकत पालखी सोहळा दिंड्यातील लाखो वारक-यां समवेत चालत होता.
मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील दुपारचा विसावा उरकून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचताच, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, उपसरपंच नासिरखान पठान, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देविदास कदम, नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, युवराज काळभोर, रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बीना काळभोर, प्रीतम गायकवाड, राजश्री काळभोर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी स्वागत केले. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग व लेझीमच्या गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. प्राचार्य सीताराम गवळी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून स्वच्छतेचे व साक्षरतेचे संदेश दिले. यावेळी नागरिकांनी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष केला. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाक्यापासून पालखी तळापर्यंत चालत गेले. अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण मोबाईलमध्ये बंदिस्त केली.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष नितीन काळभोर, हभप रामदास काळभोर,वैभव काळभोर, शुभम काळभोर, जे के सेल्स उद्योग समूह फैय्याज खान मेटकरी, अक्षय काळभोर रिजवान खान मेटकरी, विनय साबळे शरद काळभोर, ओम काळभोर यांनी कवडीगाव रस्त्यावर फराळाचे वाटप केले. वाकवस्ती येथे पालखीचे साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, देविदास काळभोर, ऋषिकेश काळभोर, गौरव काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
छत्रपती संभाजी नगर येथे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाराष्ट्र केसरी पै राहूल काळभोर यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. वैष्णवी नर्सिंग होम व पूर्व हवेली डाॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यांत आले होते.
शुभेच्छांचा वर्षाव घेत पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सात वाजण्याच्या सुमारास पोहचताच, पालखीचे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळा मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहचली. पालखी तळावर आरती झाल्यानंतर लाखो वैष्णवांचा सोहळा विसावला.
पृथ्वीराज कपूर मेमोरीयल हायस्कूलचे ढोल लेझीम पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. तर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन मुलगी वाचवा आणी वृक्षदिंडीद्वारे झाडे लावा, झाडे जगवा आणी पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन जनजागृती केली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलामंचच्या कलाकारांनी ग्रामस्वच्छता अभियान, महिला सबलीकरण व पर्यावरणाबाबत जनजागृती केली. यावेळी वन विभागाच्या वतीने प्रथमच एक झाड आईसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत एक हजार वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल प्रमोद रासकर, वनरक्षक अंकुश कचरे, अशोक गायकवाड, कोमल सपकाळ, पुजा कुबल, प्रिती लागले, ऋतुजा कचरे व वनमजूर उपस्थित होते.
पालखी सोहळा पालखी तळावर मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली.यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, मंडल अधिकारी लक्ष्मण भांडे, रूपाली सरतापे, माधुरी बागले, परिसरातील ग्राममहसुल अधिकारी, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, प्रियांका भिसे, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी एस एन गवारी, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, माजी सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड उपस्थित होते. रात्री जागर व किर्तन झाले.
दरम्यान, योगिनी एकादशीचा उपवास असल्याने सर्व वारक-यांना अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट, अंबरनाथ लोकसेवा प्रतिष्ठाण, विश्वरत्न फौंडेशन, संत निरंकारी मंडळ, शितलाशक्ती मंडळ, तिरंगा मित्र मंडळ, शिवशक्ती मंडळ, जय बजरंग तरूण मंडळ, संत रोहिदास चॅरीटेबल ट्रस्ट, जय महाराष्ट्र तरूण संघटना, जय जवान ग्रामविकास प्रतिष्ठाण, राजा शिवछत्रपती तरूण मंडळ, महात्मा फुले मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, त्रिमुर्ती मित्र मंडळ, समता समाजसेवा तरूण मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, श्रीमंत अंबरनाथ तरुण मंडळ, महात्मा गांधी मित्र मंडळ तसेच मुस्लिम व शीख समाज बांधव व इतर सेवाभावी संस्थानी चहा व खिचडी, चिवडा, केळी आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. रात्रभर चाललेल्या भजन, किर्तन, जागर, प्रवचन व हरीनामाच्या जागरामुळे संपुर्ण लोणी काळभोर पंचक्रोशीतील परीसर विठ्ठलमय होवून गेला होता. पालखी तळावर पालखीचा मुक्काम असला तरी पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या गावातील मंदिरे, शाळा, कॉलेज व आपल्या नेहमीच्या ठिकाणी मुक्कामी होत्या. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.







