पुणे : मावस भावासोबत भांडण झाल्याने समजावून सांगण्यासाठी बोलवले असता सहा जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर व त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (ता. २२) दुपारी तीनच्या सुमारास कर्वेनगर येथील स्पेन्सर चौकातील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
संदेश बालाजी आवटे (वय-१७, रा. बराटे चाळ, कर्वेनगर) याने अलंकार पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. २३) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आदित्य चुरी, यश कोंढे, सुयश ढोरे, यश शिंदे यांना अटक केली आहे. तर आर्यन पाटणकर व अनिल विश्वकर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश आवटे याचा मावस भाऊ रुद्र सुकाडे याचे आदित्य चुरी व त्याच्या भावासोबत भांडण झाले होते. त्यामुळे संदेश याने आरोपींना समजावून सांगण्यासाठी लक्ष्मी टेरेस बिल्डींग समोरील सार्वजनिक रोडवर बोलावले होते. आदित्य चुरी हा त्याच्या साथीदारांसह त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. दरम्यान, संदेश याने शनिवारी अलंकार पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.