पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात तरुणीला धारदार कोयत्याच्या धाकाने लूटमार करून तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. अशातच आता बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाइल, अन्य वस्तू असा 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना रविवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास बाणेर टेकडीवर घडली आहे. या प्रकरणी अबिनियू चवांग (वय-३६, रा. रोहन नील अपार्टमेंट, औंध, मु.रा. नागालँड) यांनी चतुः शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अबिनियू आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई रविवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी 18 ते 20 वयोगटातील चार जणांच्या टोळक्यांनी त्यांना अडवले. त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच अबिनियूची मैत्रीण चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला.
त्यांच्याकडील मोबाइल, इअर बड, तसेच अन्य साहित्य चुरून पसार झाले. घाबरलेले अबिनियू आणि त्यांची मैत्रीण या दोघांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशीरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण चौगले करत आहेत.