लोणी काळभोर (पुणे) : मागील १५ दिवसांपासून एका जागेवर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीला लागलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती, गणपती मंदिरामागे सोमवारी (ता. ५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेत चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. दीपक एकनाथ पाटील असे चारचाकीच्या मालकाचे नाव आहे. या आगीत चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील हे गुजरवस्ती परिसरातील गणपती मंदिराच्या पाठीमागे राहतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची चारचाकी गाडी आहे. पाटील हे काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांनी त्यांची गाडी राहत असलेल्या ठिकाणी मोकळ्या जागेत लावली होती. गाडी लावलेल्या ठिकाणी वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते.
सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी येथे कचरा पेटवल्याची माहिती नागरिकांनी दिली होती. पेटवलेला कचऱ्यातून त्याठिकाणी वाळलेल्या गवताने पेट घेतला व चारचाकीला आग लागली. या घटनेची माहिती पाटील यांना त्यांच्या कुटुंबियांनी फोनद्वारे दिली. पाटील घटनास्थळी दाखल होईपर्यंत गाडीने पूर्णपणे पेट घेतला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच पुणे मनपा काळे बोराटेनगर अग्निशमन केंद्राचे चालक अमित सरोदे, फायरमन सचिन आव्हाळे, स्वप्निल टुले, केतन घाडगे, पवन गावडे आणि ‘पीएमआरडीए’चे चालक ओंकार पाटील, महेश पाटील आणि प्रकाश मदने यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
जवान बाबासाहेब चव्हाण यांची तत्परता..
जवान बाबासाहेब चव्हाण घटनेची माहिती मिळताच सुटी असतानाही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुणे महानगरपालिकेची अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. सुरक्षेची कोणतीही साधने नसतानाही गाडी येईपर्यंत पाण्याच्या सहायाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या वेळी परिसरातील नागरिकांनी आग पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
View this post on Instagram