लोणी काळभोर, (पुणे) : मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (ता. १८) अज्ञात चोरट्यांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर परिसरातील सहा ठिकाणी घरांचे कुलूप कटरच्या सहाय्याने कट केले आहे. यामध्ये एका टपरीचा समावेश आहे.
घरात शिरून चोरट्यांच्या हातात काही लागले नसले तरी घरातील इतर साहित्य हे अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आनंद वैराट, विनायक कांबळे, रेखा सावंत, व बापू कुदळे अशी घरफोडी झालेल्या घरमालकांची नावे आहेत.
ग्रामीण भागामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. शेतकरी थंडीमुळे लवकर झोपत आहे. तसेच, रात्रीच्या वेळी घरातून बाहेर येत नसल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला. वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता असल्याची भावना निर्माण झाली आहे. तसेच बंद घराचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.
दरम्यान, “लोणी काळभोर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा.” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लोणी काळभोर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली आहे.