पुणे : किरकोळ कारणावरून मारहाण, धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आरोपी महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुशंगाने तयार केलेला अहवाल वाचून दाखवत असताना अहवाल मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन महिला संतप्त झाली. तिने चक्क महिला पोलीस हवालदाराला मोबाईल फेकून मारत धक्काबुक्की केली. सेंट्रल बिल्डींग येथील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या कार्यालयात हा प्रकार सोमवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत महिला पोलीस हवालदार राखी योगेश खवले (पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी श्वेता प्रमोद कदम (रा. सिद्धार्थ नगर, येरवडा गावठाण, पुणे) हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गुन्ह्याबाबत तक्रार दिली होती. तक्रार अर्जाच्या अनुशंगाने अप्पर पोलीस आयुक्तांना खडकी सहायक पोलीस आयुक्तांनी अहवाल पाठवला होता. अहवाल पाहून फिर्यादी राखी खवले या अर्जदारांना (आरोपी महिला) सांगत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने हा अहवाल मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन गोंधळ घालून आरडाओरडा केला. महिलेला रूद्रावतार पाहून तिला कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितले. बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागाने तिने हातातील मोबाईल राखी खवले यांच्या डोक्यात फेकून मारला. एवढ्यावरच न थांबता त्यांना धक्काबुक्की केली.
दरम्यान, आरोपी महिलेला बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी देखील तिने पोलीस अंमलदारासोबत धरपकड करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तांगडे करीत आहेत.