उरुळी कांचन : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते आणि ध्येय नक्की गाठता येते. हे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शेतकरी श्रीकांत घुले यांचा मुलगा अनिकेतने सिद्ध करून दाखविले आहे. अनिकेतने ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या पदाला गवसणी घालत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. तर अनिकेत अधिकारी झाल्याने त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा 2023 अंतर्गत महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी ) पदाची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत अनिकेतने उत्तीर्ण होऊन यश संपादित केले. या यशासाठी अनिकेतने कोणत्याही शिकवणीला न जात घरीच अभ्यास केला आणि हे यश मिळविले आहे. अनिकेतने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अनिकेतचे वडील श्रीकांत घुले हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर अनिकेतची आई सविता या गृहिणी आहेत. घुले दांपत्यांना दोन मुले आहेत. तर थोरल्याचे नाव अनिकेत आहे. आपल्या मुलांना चांगले शिकवून उच्चपदस्थ बनवण्याचा ध्यास घुले यांनी सुरुवातीपासून घेतला होता. अनिकेतची घरची परिस्थिती अत्यंत बेताची.
मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. अनिकेतचे प्राथमिक शिक्षण उरुळी कांचन येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरातून घेतले. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर अनिकेत ने पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातून सन २०१२ साली संगणकीय विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली.
घरची परिस्थिती नाजूक असल्याने अनिकेतने संगणकीय विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केलेली असतानादेखील, आपण एवढे शिकलेलो आहोत. आपण शेतात कसे काम करावे. याची तमा न बाळगता वडिलांसोबत शेतात काम करण्याचा निर्णय घेतला. आणि तब्बल ८ वर्ष अनिकेत शेतात काबाडकष्ट केले. मात्र अनिकेतने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न अनिकेतला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर अनिकेतने सन २०२० साली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरवात केली.
अनिकेतने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिल्या. परंतु यशाचा रस्ता खडतर होता. अंतिम यश हे थोड्या थोड्या गुणांनी हूलकावणी देत होते. मात्र अनिकेत अपयशाने खचला नाही. जिद्द, मेहनत, संयम, चिकाटीच्या जोरावर पुन्हा जोरदार अभ्यास केला. आणि महसूल विभागात ग्राम महसूल अधिकाऱ्याची परीक्षा उत्तीर्ण झाला.
दरम्यान, शेतकऱ्याचा मुलगा अनिकेत घुले हे ग्राम महसूल अधिकारी झाले आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना अनिकेत यांनी यशाचे शिखर गाठून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिकेत होय. अनिकेतने आताचा महसूल विभागातील प्रशिक्षण घेऊन निमगाव खलू (ता. श्रीगोंदा) येथे कर्तव्य बजावीत आहे. श्रीगोंदाच्या तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी अनिकेतचा नुकताच सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
याबाबत पुणे प्राईम न्यूज शी बोलताना अनिकेत घुले म्हणाला की, या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील व भाऊ आहेत. या सर्वांनी मला नेहमी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, त्या अपयशाला अभ्यासाच्या परिश्रमाची जोड द्या. त्यानंतर तुम्हीही यशाचे शिखर नक्की गाठू शकता. असे अनिकेत घुले यांनी सांगितले आहे.