उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटच्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जात असताना टेम्पोने पाठीमागून ट्रकला दिलेल्या धडकेत, टेम्पोत बसलेल्या केडगाव (ता. दौंड) येथील 15 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत तळवाडी चौकातील कांचन स्वीट समोर रविवारी (ता. 11) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी टेम्पोचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव भाऊसाहेब माळी (वय 15,रा. बोरमलनाथ मंदिराजवळ, केडगाव चौफुला, ता. दौड) असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विनायक हनुमंत घोलप (वय 24, चालक, मुळ रा. सिंधी जवळगा ता. जि. लातुर सध्या रा. धायगुडेवाडी, बोरीपार्धी ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापुराव दत्तात्रय मोहोळकर (रा. बोरीपार्धी धायगुडेवाडी ता. दौड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी यवतच्या बाजुकडून दोन टेम्पो व एक सिमेंटचा ट्रक हे पुण्याच्या दिशेने निघाले होते. उरुळी कांचन हद्दीतील कांचन स्वीटसमोर आले असता पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने पुढे असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी त्याच रस्त्यावर विरुद्ध दिशेने एक टेम्पो निघाला होता.
यावेळी ओव्हरटेक करताना टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटला व सिमेंटच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी टेम्पोत क्लीनर बाजूला बसलेला वैभव याला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी टेम्पोचालक हा पोलीस ठाण्यात कोणतीही खबर न देता निघुन गेला. याप्रकरणी घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.