शिरूर,ता.०७: मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच घरासमोरून आठ महिन्यांपूर्वी घेतलेली दुचाकी गाडी चोरीला गेल्यामुळे शिरूर (पुणे) येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने तीन आठवड्यांपूर्वीच शिरूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र, गाडीचा शोध लावण्याऐवजी, चोराने वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे दंड वसुलीसाठी पोलिसांनी दुचाकी मालक तरुणाकडे तगादा सुरू केल्यामुळे हैराण झालेल्या तरुणाने आपली कैफियत मांडली.
शिरूर (पुणे) येथील आकाश चाकणे या सर्व सामान्य कुटुंबातील तरुणाची दुचाकी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे त्याला सोमवारी (ता.०७) मोबाईलवर प्राप्त झालेल्या दंडाच्या चलनावरून उघड झाले. त्यानंतर आकाश चाकणे यांनी पुन्हा शिरूर पोलिसांकडे धाव घेतली परंतू,तु मची गाडी दोन दिवसांत शोधून देऊ, तुम्ही पण गाडी शोधण्यासाठी प्रयत्न करा, असे शिरूर पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे वैतागलेल्या तरुणाने संताप व्यक्त केला.
१५ मार्च रोजी शिरूर शहर परिसरातील गुजरमळा येथून राहत्या घरासमोरून आकाश मधुकर चाकणे या तरुणाची होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी गाडी (एमएच12डब्ल्यूडब्ल्यू2338) चोरीला गेली होती.जवळपास तीन आठवड्यानंतर गाडीचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले. मात्र,दुचाकी चोराने “सैराट” दुचाकी चालवून वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे चाकणे यांच्या दुचाकीचा शोध लागला असून, शिरूर पोलिसांनी तत्काळ फिर्यादी मालक चाकणे ह्यांना त्यांची दुचाकी मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.