पुणे : व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात कमिशन म्हणून लाखो रुपये उकळले. त्यानंतर देखील वारंवार व्याजाच्या पैशांची मागणी करून, दमदाटी सुरु केली. सावकारी कर्जाच्या जाचाला कंटाळून अखेर ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केशवनगर येथील साईसृष्टी बिल्डिंग याठिकाणी घडली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, राम परशुराम भोसले (वय ५१) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेखा राम भोसले (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश, राज तावदान, त्याची पत्नी, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, त्यांची पत्नी, अजित इरकल यांच्यासह आणखी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१६ ते १५ नोव्हेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांनी त्यांच्या आईच्या आजारपणासाठी तसेच वैयक्तिक कारणांसाठी त्यांच्या ओळखीच्या राजेश आणि राज तावदान याच्या पत्नीकडून कर्ज काढले होते. त्या कर्जापोटी त्यांनी चार लाख रुपये त्यांना परत केलेले आहेत. आर्थिक अडचणी आल्यामुळे भोसले यांनी पुन्हा सिद्धू मंगवानी याच्याकडून पाच लाख रुपये कर्जाने घेतले. कर्ज देण्याच्या बदल्यात कमिशन म्हणून ५० हजार रुपये देखील त्याला दिले.
दरम्यान, अन्य आरोपींनी देखील भोसले यांना वेळोवेळी व्याजाने पैसे दिले आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून कमिशन म्हणून लाखो रुपये उकळले. त्यानंतर देखील त्यांच्याकडे वारंवार व्याजाच्या पैशांची मागणी केली. एवढेच नव्हे तर घरी येऊन सतत दमदाटी करायला सुरुवात केली. त्रासाला कंटाळून अखेर राम भोसले यांनी जीवन संपवले.